अमृतमहोत्सव व श्रीमद्वासुदेव जन्मोत्सव

 अमृतमहोत्सव व श्रीमद्वासुदेव जन्मोत्सव

From 75 years after Independence, while leading our nation towards the path of development have we ever thought about what this development means to us and those who gave us independence, our ancestors? This article is a contemplation penned down on the auspicious occasion of Azadi ka Amrit Mahotsav as well as on the eve of Shreemad Vasudevanand Saraswati Janmotsav.

वन्दे मातरम्!

वासुदेव दत्त!

सुवर्णकालीन भारत – जिथे सर्वविध ऐश्वर्य आपल्या सर्व कला प्रकाशवीत नांदत होते, परमसत्य जाणून – इह, पर व नश्वराच्या विवेकाने मानवीय उत्कर्ष साधु पाहत होते  – मूळ चैतन्यरुप असलेल्या चराचराशी संवाद साधता साधता – व्यष्टीला समष्टीस भेदून परमेष्टीरुप होता येते हे प्रत्यक्ष ‘दर्शन’ साऱ्या विश्वाला घडवू पाहत होते..

काळ – म्लेंच्छ व यवनांच्या रूपाने आला. स्वरूपाच्या ज्ञानाने ‘स्व’राज्याच्या अनंत आकाशात विहार करीत असलेले राष्ट्र पराधीन – बंदिस्त झाले.

निराश्रित व असहाय्य असलेले शरणार्थी – सत्तेच्या लालसेपायी अविचाराने पछाडल्या गेले – मदोन्मत्त होऊन साऱ्या जगाच्या मातृस्थानी असणाऱ्या भारतमातेची विटंबना करु लागले. देवांनी निर्मित केलेला देश व ऋषींनी उभारलेला राष्ट्र ढळमळू लागला. मन – वाणी  – बुद्धीस आच्छादून धर्म – अर्थ – काम – मोक्ष अश्या पुरुषार्थरुपी स्तंभ भेदल्या गेल्यामुळे तेजोपासनेचे ब्रीद धारण करणारा भारतवर्ष – गडद अंधकाराने ग्रासल्या गेला.

मातृरुप असलेल्या या भारतीचे अनन्वित छळ होत असताना – समाजाचे अत्यधिक शोषण होऊनसुद्धा हा ‘जागा’ होत नाही हे पाहून – त्यातील सुप्तरुपाने वसत असलेल्या राष्ट्रधर्मरुपी अग्नीला चेतविण्यासाठी – समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी – योग्य मार्गावर राष्ट्राचे उन्नयन करण्यासाठी अनेक ‘द्रष्टे’ – क्रांतिकारकांच्या भूमिकेत सक्रिय झाले. सुप्त समाजास जागे करून त्याचे ‘नेतृत्व’ पत्करायला सिद्ध झाले. या राष्ट्रातील सर्व भूमिपुत्रांच्या मनामध्ये क्रांतीस्फुल्लिंग चेतविल्या गेला – त्याने सहस्त्रलक्ष मशाली पेटल्या व अवघा भारतीय समाज  ‘स्वातंत्र्यलक्ष्मी’च्या जागरणासाठी सिद्ध झाला.

अनेक ज्ञात – अज्ञात क्रांतिकरांच्या हौतात्म्याने प्रसन्न झालेली स्वातंत्र्यलक्ष्मी – तिच्या प्रभेनेच सर्व परकीयसत्ताधीशरुपी असुरांचा नायनाट करीत पुन्हा एकदा या क्षितीवर प्रकट झाली.

कोट्यवधी वर्षांपासून परबंधनाने बद्ध झालेली ही भूमी – अखेरीस मुक्त झाली!!

अगणित काळांपासून चालत असलेला हा संघर्ष शब्दांनी मांडता यावा इतका सोप्पा नाही…आणि ते समजायला आपल्याला शब्द लागत असतील तर अजून आपण या राष्ट्राला व त्याच्या मूलस्तंभाला जाणू शकलो नाही – जाणण्याचा प्रयत्नही करू शकलो नाही.

आपल्या पूर्वजांच्या बलिदानाने – रक्ताने रंजित असलेले हे स्वातंत्र्यऋण फेडता येणे शक्य नाही – कारण प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्यासाठी झालेला व केल्या गेलेल्या या संघर्षाची कल्पना करणे सुद्धा तुमच्या – माझ्या बुद्धीच्या  आवाक्याबाहेरचे आहे.

हे स्वातंत्र्यधन प्राप्त झाल्यावर अगणित कालावधीपासून परकीयसत्ताधीन असलेल्या समाजाची पुनर्रचना करणे – या स्वातंत्र्यसंघर्षाच्या तीव्रतेची जाणीव करवून देत समाजाला योग्य दिशेने ‘नेणे’ – राष्ट्रपुरुषाला पुन्हा एकदा त्याच्या मूलाधाराच्या अधिष्ठानाने कालसापेक्ष रुप प्रदान करणे – अर्थात् पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या देशातुन – राष्ट्राची पुन्हा एकदा उभारणी – हे स्वातंत्र्ययुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या व देशासाठी आपले जीवन समर्पित केलेल्या सर्वच क्रांतिकाऱ्यांना अभिप्रेत होते.

परंतु या राष्ट्राच्या प्रारब्धाने किंवा ‘स्वातंत्र्योपासने’प्रती स्वभावतःच असलेल्या अनास्थेमुळे ‘राष्ट्रीय परमार्था’पेक्षा ‘वैयक्तिक स्वार्थ’ मोठा ठरल्यामुळे – विचार आणि विवेकाच्या पातळीवर स्वत्वाचा शोध घेण्याऐवजी आपण परकीय रुढींचेच अंधानुकरण करण्यात धन्यता मानली.

विश्वगुरु होण्याच्या नावाखाली वैश्विक सत्तेची कास धरली – चराचर विश्वाला आपल्या स्वार्थपूर्तीचे ‘साधन’ मानून  त्यांच्या निमित्ताने आपण आपलीच हानी केली आणि आत्मघातकी होऊन बसलो.

उन्नयन व विकसन म्हणजे नेमके काय हे न कळल्यामुळे – त्याचे कळलेले अर्थ पडताळूनसुद्धा पाहण्याची इच्छा न झाल्यामुळे – आज इतका कालावधी लोटून गेल्यानंतर ज्यांनी हा देश निर्माण केला व राष्ट्र उभारले – त्यांचे यामागील प्रयोजन काय?  हेच न कळल्यामुळे संभ्रमित होऊन ‘आंधळेपणाने आंधळ्यांचेच अनुकरण करीत बसलो आहोत’ ही जाणीव आता आपल्याला कुठेतरी व्हायला हवी.

या ज्ञानयुगात – यथार्थ ज्ञानाच्या अभावी भ्रांत झालेले जग – प्रगतीच्या नावाखाली अधोगतीची कास धरत आहे याची जाणीव करवून देण्यासाठीच आत्मचिंतनाने – आत्मानुसंधानाने उन्नयन व विकसन यांचे नेमके अर्थ समजावून सांगण्यासाठीच प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे ‘महर्षी’रुपाने अर्वाचीन काळात या भूतलावर येणे झाले.

श्रावण.कृ. पंचमी – भगवान दत्तात्रेयांचा निरंजन ज्ञानावतार ‘पौरुषेय वेद’ म्हणून ज्यांचा गौरव परंपरेने केला.

श्वासा-श्वासाने दत्तनामाचा ध्यास धरीत दत्तरुप झालेल्या – जीवनमार्गाला यथार्थ जाणून ज्यांनी तो आपल्या साऱ्यांसाठीच प्रशस्त केला – आपल्याला आलेले हे ‘आंधळेपण’ म्हणजे आपल्याच उपेक्षेतून – डोळसपणाचा अंगीकार न केल्यामुळे आले आहे याचा बोध करवीत ज्यांनी अवघ्या समाजास योग्य दृष्टी प्रदान केली व त्याने घडलेल्या ‘दर्शना’तून राष्ट्रनिर्माणाचा महामंत्र तुम्हा-आम्हाला प्रदान केला अश्या या अर्वाचीन महर्षी – परमाचार्य असलेल्या विभूतिमत्वाची जन्मतिथी.

आज -‘अमृत’महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपल्याला व्यक्ती व राष्ट्र म्हणून जर ‘अमृतत्वाची’ प्राप्ती करायची असेल तर समाजाच्या पुनर्रचनेच्या निमित्ताने राष्ट्रनिर्माणाचा हा महामंत्र आपल्या सर्वांनाच अवलंबिला पाहिजे – त्यानिमित्ताने समाजधारणा बनवून – विकसन व उन्नयन यांचे मापदंड व निकष डोळसपणाने समजून घेत राष्ट्राला परमोत्कर्षाकडे नेण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे..

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन व श्रीमद् स्वामींच्या जन्मतिथीच्या पूर्वसंध्येच्या या पर्वावर आत्मचिंतनातून राष्ट्रचिंतनाकडे जाणीवपूर्वक प्रवास केला पाहिजे…

हीच ‘स्वातंत्र्यदात्यांच्या’ व ‘राष्ट्रनिर्मात्यांच्या पावनस्मृतीस अभिवादन करण्याची योग्य रीत होय.

हृदयस्थ वासुदेवांचे चरण!

वन्दे मातरम्!

(Feature Image Source:Swami vasudevanand saraswati(Tembe swami)

Chinmay Shailesh Munje

Chinmay shailesh munje is a post graduate student of Bharateeya Darshana in Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek

0 Reviews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *